आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपा टोल नाक्यावर गुरुवारी झालेल्या धडक कारवाईत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व सुपा पोलिसांनी तब्बल 23 कोटी 71 लाख 94 हजार रुपयांचे सोने, चांदी आणि डायमंड जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे.
गुरुवारी सकाळी 9:30 वाजता, पुणे महामार्गावरील सुपा टोल नाक्यावर बीव्हीसी लॉजिस्टिक (कुरिअर) कंपनीची बोलेरो व्हॅन (क्रमांक 09 ईएम 9530) थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान, व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी व डायमंड आढळून आले. गाडी पुण्यावरून अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती गाडीत असलेल्या तीन व्यक्तींनी दिली.
प्रारंभी, गाडीत सुमारे चार कोटी 97 लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे बिले दाखवण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष तपासणी केल्यानंतर आणखी सोने व चांदीचा ऐवज आढळून आला. गाडीतील दाखवलेली बिले व प्रत्यक्षात सापडलेला माल यात मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले.
या धाडीत पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, आयकर विभाग व निवडणूक आयोगाचे अधिकारी सहभागी होते. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पंचनामा करून ऐवजाची मोजमाप करण्यात आली. जप्त केलेला ऐवज जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे, आणि पुढील तपासणीसाठी हा ऐवज कोषागारात ठेवण्यात येणार आहे.