नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेल रोड भागात नागरिकांना सातत्याने संपर्कात राहणारा ओळखीचा आणि आश्वासक चेहरा हवा आहे, आणि महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले याच्यात तो चेहरा पाहत आहेत, असा दावा ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी केला आहे. जेल रोडच्या प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांत ॲड. ढिकले यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत आढाव यांनी हा विश्वास व्यक्त केला.
आढाव म्हणाले, “२००९ मध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून या भागात ॲड. ढिकले यांच्यासारखा कार्यकर्ता लोकांसाठी समर्पित राहिला आहे. त्यांच्या मागील कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, आणि अन्य पायाभूत सुविधांचे काम गतीने झाले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी ढिकले यांना पुन्हा एकदा निवडून देण्याची गरज आहे.”
यावेळी माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी ॲड. ढिकले यांचा उल्लेख “आश्वासक चेहरा” म्हणून केला, तर माजी नगरसेविका मीरा हांडगे यांनी त्यांना “जनसामान्यांच्या मदतीला तत्काळ धावून येणारा लोकप्रतिनिधी” म्हणून गौरवले. शरद मोरे यांनी ॲड. ढिकले यांच्या घरगुती जनसंपर्काचे कौतुक करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
प्रचार सभेला मंगेश मोरे, सचिन हांडगे, राहुल बेरड, आप्पा नाठे, संदीप पाटील, प्रवीण पवार, सचिन सिसोदे, दिनेश नाचण, सुरेखा निमसे, कुंदा सहाणे, राहुल गायकवाड, शंतनू निसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत ॲड. ढिकले यांच्या रूपाने पूर्व मतदारसंघातील जनतेला एक सक्षम आणि अनुभवी नेतृत्व मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.