आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author
0 minutes, 34 seconds Read

नागपूर :  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी  आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली.

रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,  महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख भगिनींच्या खात्यात लाभाची 3 हजार 225 कोटी इतकी  रक्कम जमा करण्यात आली आहे. आज दुसऱ्या टप्यात 52 लाख भगिनींच्या खात्यात 1562 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने 1 कोटी 60 लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. राज्याच्या तिजोरीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळायलाच हवा. या योजनेच्या उत्तम अंमलबजावणीमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या संबंधात कोणत्याही अपप्रचाराला महिलांनी बळी पडू नये. ही योजना भविष्यातही कायम स्वरुपी सुरु राहणार असून लाभाच्या रकमेत वाढ होणार आहे. सर्वसामान्य महिलांसाठी दीड हजार ही रक्कम  मोठी आहे. या रकमेतून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होणार असून अर्थव्यवस्थेलाही या योजनेमुळे चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या लखपती दिदी योजनेत राज्यातील 50 लाखांहून अधिक महिलांना लखपती केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकार अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे. तरुणांनाही  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. राज्य शासन अत्यंत संवेदनशिलतेने कार्य करीत आहे. शिक्षण शुल्क भरु न शकल्याने आत्महत्या कराव्या लागलेल्या तरुणीची माहिती मिळताच राज्य शासनाने  शिक्षण शुल्कात पूर्ण सवलत देण्याच्या निर्णय घेतला. राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी देणारे आणि कृतीशीलतेने काम करणारे सरकार आहे.  या सरकारने विविध घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करतांनाच विकास आणि जनकल्याण याची सुयोग्य सांगड घातली आहे. या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासमवेत त्यांच्या सुरक्षिततेचाही  प्राधान्य दिले आहे. याबाबतच्या दोषींवर  कठोर कारवाई करण्यात येईल, असे  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य -नितीन गडकरी

महिला बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राने सर्वाधिक उत्तम काम केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक मोठा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कौतुक केले. राज्यातील महिलांमध्ये या योजनेमुळे उर्जा संचारली असून  या लाभातून महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाले आहे. यातून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. सामाजिक समतेसोबतच आर्थिक समता प्रस्थापित होण्यास या योजनेची मोठी मदत होणार आहे. शोषित आणि वंचित समुहातील महिलांना यातून जगण्याचा नवा विश्वास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदयाचा सामाजिक विचार यानिमित्ताने प्रत्यक्षात येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

 योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात परिवर्तन – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून  नवी आश्वासकता व विश्वास राज्यातील बहिणींना मिळाला आहे. या योजनेला राज्यातील महिलांनी दिलेला अपूर्व प्रतिसाद लक्षात घेवून या योजनेच्या जोडीला आणखी काय देता येईल याचा प्रयत्न शासन करीत आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना तेवढयाच सक्षमपणे राबवू, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले. राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरु केला आहे. महिला विकसित झाल्याशिवाय  खऱ्या अर्थाने भारत विकसित होणार नाही, हे लक्षात घेवून  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे.  विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी सर्व पातळ्यांवर मदत करुन परिवर्तन घडविले जाईल. इतिहास बदलण्याची शक्ती महिलांमध्ये असते हे लक्षात घेवून त्यांच्या जीवनात विविध योजनांच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांच्या सन्मानाची जोपासना केली जाईल. अशी हमी देतानांच नागपुरच्या विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचीही श्री. फडणवीस यांनी  यावेळी माहिती दिली. नागपूर शहरात झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.

महिला कल्याणाच्या योजनांसाठी 75 हजार कोटी   अजित पवार

या योजनेसंदर्भात करण्यात आलेल्या अपप्रचाराला आता उत्तर मिळाले असून तिच्या अंमलबजावणी संदर्भात पसरविण्यात आलेली नकारात्मकता अनाठायी असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी असून ही भविष्यातही कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. या योजनेसोबतच सिलेंडर वाटप, मोफत शिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार त्यासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी खर्च करत आहे. महिलांना सबळ, सक्षम, सन्मानीत आणि सुरक्षित करण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारकडून करण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सजग आहोत अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले.

नागपुरात  महिलांना 1 हजार 403 पिंक ई-रिक्षा अदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण या योजनेअंतर्गत राज्यातील ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी जास्तीत-जास्त लाभ वितरीत करण्यात आल्याचे सांगितले. त्रुटींमुळे अर्ज बाद ठरल्यास महिलांना पुन्हा अर्ज करता येईल व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. राज्यात 10 हजार महिलांना पिंक-ई रिक्षा वितरीत करण्यात येणार असून यापैकी 1 हजार 403 रिक्षा नागपुरात वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या नवरात्रोत्सवात अंगणवाडी सेविकांना विशेष लाभ देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

महिलांच्या खात्यात थेट लाभाचे वितरण

या कार्यक्रमादरम्यान मंचाच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या खास डिजीटल यंत्राची कळ दाबून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील 52 लाख महिलांच्या बँक खात्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभाचे थेट वितरण केले. या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी  महिलांना आर्थिक लाभ देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे. 50 हजार महिलांचे अर्ज त्रुटींमुळे बाद ठरले असून या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना लाभाचे धनादेश वितरीत

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रातिनिधीक दहा लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश वितरीत करण्यात आले. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या प्रातिनिधीक लाभही वितरीत करण्यात आला.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे रेशीमबाग येथील आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अदिती तटकरे यांनी केले. तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात व औक्षण करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत झाले. येथे उभारण्यात आलेल्या विशेष मंचावर प्रवेश करताच महिलांनी हात उंचावून आणि राखी बांधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञभाव व्यक्त केला. त्यांनी उपस्थित महिलांवर पुष्पवृष्टी करुन महिलांचे अभिनंदनही केले.

मध्यप्रदेशच्या खासदार माया नरोलिया, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, प्रवीण दटके, ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427