नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर एक वेडसर व्यक्ती उभ्या असलेल्या कृषीनगर एक्सप्रेसच्या डब्ब्यावर चढला आणि इकडे-तिकडे चालू लागला. याच गाडीवरून त्याने दुसऱ्या उभ्या असलेल्या महानगरी एक्स्प्रेसवर उडी मारली. अत्यंत धोकादायक स्थितीत, ओव्हरहेड वायर अगदी जवळ असल्याने थोडासा स्पर्शही झाला असता तर त्याचा जीव गमावण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला, ज्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला रेल्वेच्या डब्ब्यावरून खाली खेचले. या सर्व प्रकारामुळे दोन्ही गाड्या अर्ध्या तासाच्या विलंबाने स्थानकाबाहेर निघाल्या. सदर वेडसर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या मानसिक स्थितीची चौकशी केली जात आहे.