चांदवड तालुक्यातील रापली शिवारात कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा 5 वर्षीय मुलगा 1 तारखेला दुपारी 12 वाजल्यापासून बेपत्ता होता. घटनेची तातडीने दखल घेत, पोलिसांनी रात्री 6 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केली. मनमाडचे डी.वाय.एस.पी बाजीराव महाजन आणि चांदवड पी.आय. कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपासाची जोरदार मोहीम राबवण्यात आली. गावकऱ्यांनी शेतातील पिके तुडवून शोध घेतला तसेच अनेक विहिरींची कसून तपासणी केली.
तपासाअंती घरालगत असलेल्या विहिरीचे पाणी उपसल्यावर कृष्णा बिडगर याचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी कोणाचीच हिम्मत होत नव्हती, परंतु कातरवाडीचे समाजसेवक भागवत झाल्टे यांनी धाडस दाखवून रात्री विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. या घटनेने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त झाली आहे, तर इतर लोकांनी मदतकार्याला हातभार लावला.