गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना एसटी कामगारांच्या अचानक संपामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेड, दापोली, आणि मुंबई सेंट्रल येथून कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द झाल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. अनेकांनी गणेशोत्सवासाठी एसटी बसचे आरक्षण करून ठेवले होते, परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
मंगळवारी आणि बुधवारी मुंबई सेंट्रल येथे एसटी बससाठी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आगार वाहतूक नियंत्रण कक्षासमोर जमा होत नाराजी व्यक्त केली. स्थानकावर उपस्थित कामगारांची देखील धावपळ झाली. त्यामुळे आता अनेक प्रवासी इतर मार्गाने गावी जाण्याचा पर्याय शोधत आहेत.
एसटी महामंडळातील प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कामगारांनी संप पुकारला आहे. या संपात कोकणातील खेड, दापोली आगारांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे मुंबई सेंट्रलहून कोकणात जाणाऱ्या बसेसवर मोठा परिणाम झाला आहे. बसेस उपलब्ध नसल्याने प्रशासनाला कोकणातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे.