google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

रथयात्रा किंवा रथोत्सवची परंपरा काय आहे असे बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण होतात

author
0 minutes, 2 seconds Read

आपला महाराष्ट्र वृत्त

नाशिक :- १७७२ पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची २४७ वर्षांपासूनची परंपरा आहे. श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्यप्राप्ती व्हावी यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला. या श्रीराम रथाची देखभालीची जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिली होती. त्यावेळी रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघ स्थापन करून व्यायामप्रेमी घडविले व तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पाडू लागले. तेव्हापासून ते आजतागायत श्रीराम रथाची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे. पूर्वी रथमार्ग खडतर होता. एकदा रथमार्गावरील वाघाडी नाल्यात म्हणजे च वरुणा नदीत(सध्याचा काट्या मारुती जवळचा हत्तीपुल) श्रीरामाचा रथ चिखलात फसल्याने त्यावेळी समस्त पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा रथ सुखरूपपणे बाहेर काढला होता तेव्हापासून रामरथ ओढण्याचा मान हा पाथरवट समाजाकडे सुद्धा आहे. रामरथाचा मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, तर गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे. या रथाचा इतिहास बघितला तर रथाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात.

बुवा म्हणजे काय
बुवा ही एक पदवी आहे, पुजारी वंशा मध्ये जे ह्या पूजेचे मानकरी असतात त्यांना बुवा असे संबोधले जाते. हे जे बुवा असतात ते वर्ष प्रतिपदापासून म्हणजेच चैत्र पाडव्यापासून ते नवमी पर्यंत व्रत धारण करतात. नखे न कापणे,केस न कापणे, दाढी न करणे, उपवास करणे, गादीवर न झोपणे, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे, सत्य बोलणे, श्रीराम जय राम, जय जय राम या व्रताचा अखंड जप करणे इ. या व्रता मध्ये समाविष्ट असते. ९ दिवसाचा उपवास दशमीच्या दिवशी उपवास सुटतो पुन्हा एकादशीला उपवास करून द्वादशी ला संपन्न होतो. म्हणून ह्या पूजेचा मानकरी ह्यास बुवा असे संबोधले जाते.

तसेच हे बुवा रथाचे मार्गक्रमण होत असताना रथाकडे पाठ करीत नाहीत आणि पूर्ण मार्गक्रमण रथाकडे मुख करून चालतात.

श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. रथाच्या पुढच्या बाजूला जसा नाडा असतो तसाच मागच्या बाजूस ही नाडा असतो. मागचा नाडा उतारावर रथ लावून धरण्याचे कार्य करतो. काही वर्षांपूर्वीच या रथाची चाके बदलण्यात आली आहेत.

नाशिक च्या गरुड रथाचे नामकरण रामाचा दास म्हणजेच भगवान श्री विष्णूचा दास गरुड, यावरून च रथाचे नाव गरुडरथ असे पडले आहे. गरुड रथा मध्ये भगवान श्री रामचंद्रांच्या पादुका विराजमान होत असतात आणि ह्या पादुका गरुड रथा मधून नाशिक च्या लोकांच्या दर्शनासाठी जात असतात. गरुड रथ हा गोदावरी नदी ओलांडून दिल्ली दरवाजा मार्गे गाडगे महाराज पुलाखालून मध्य नाशिक मधून दहीपूल, मेनरोड, बोहोरपट्टी,सराफ बाजारात फिरून परत भांडी बाजार मार्गे गोदाघाट कपूरथळा येथे येत असतो.
तर पंचवटी मधून
रामरथा मध्ये भगवान श्रीरामांच्या तांब्याच्या बाहुमूर्ती म्हणजे च उत्सव मूर्ती विराजमान झालेल्या असतात. हा रथ गोदावरी नदीचा तीर / घाट ओलांडून पलीकडे जात नाही. त्यामुळे रामरथ हा गणेशवाडी आयुर्वेदिक दवाखान्या जवळून गाडगे महाराज पुलाच्या खाली उतरून म्हसोबा पटांगण येथे भाविकांच्या दर्शनासाठी उभा राहतो.

गरुड रथाचे मानकरी प्रामुख्याने अहिल्याराम व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि सदस्य असतात. तसेच रथाचे नियमन आणि मार्गक्रमण करण्यासाठी पंच असतात जे रथाचे नियोजन पाहतात. गर्गे, दीक्षित, चंद्रात्रे, मुठे परिवार अहिल्याराम व्यायाम शाळेशी निगडित आहेत,

रथामधील भगवान श्रीरामचंद्र :-
रथामध्ये ज्या मूर्ती ठेवल्या जातात त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सव मूर्ती असे संबोधले जाते, मंदिरामध्ये ज्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्ती विराजमान आहेत त्या पाषणाच्या आहेत ,त्या मंदिरातून हलवणे अशक्य असल्याने ज्या मूर्ती वर रोजचे उपचार केले जातात, दही, दुधाचे, पंचामृताचे अभिषेक केले जातात त्या ह्या तांब्याच्या मूर्ती असतात. ह्याच तांब्याच्या मूर्ती राम रथा मधून लोकांना दर्शन व्हावे या उद्देशाने रथयात्रेच्या स्वरूपात निघतात. रथयात्रेच्या दिवशी रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा टाकून रेखीव रांगोळ्या काढून रथ यात्रेचे स्वागत केले जाते. रथ आला की फुलांनी भरलेल्या परड्या रथावर पुष्पवृष्टी करतात. रथाचे चौका चौकात थांबून प्रभूरामचंद्रांचे स्वागत हार फुले वाहून व औक्षण करुन केले जाते. पूर्वी गरुड रथ सरकार वाड्याजवळ आला की श्रीमंत पेशवे रथाची पूजा करत. आज ही सरकार वाड्या जवळ रथाचे स्वागत सरकारवाडा पोलीस स्टेशन चे प्रमुख करतात.

रथाचा सांभाळ आणि देखभाल :-
राम रथाचा सांभाळ आणि देखभाल, दुरुस्ती, नियोजन हा रास्ते आखाडा यांच्या कडे असतो. त्याच प्रमाणे गरुड रथाचा सांभाळ, देखभाल, दुरुस्ती, रंगकाम हे सर्व श्रीकाळाराम मंदिर संस्थान पाहत असते. फक्त गरुड रथाचे नियमन आणि मार्गक्रमण हे अहिल्याराम व्यायाम शाळेकडे असते.

धुरी म्हणजे काय :-
पूर्वीच्या काळचे रथ वळवण्याचे साधन म्हणजेच धुरी होय, जे आजही रथाच्या सोबत जोडलेले आहे.
धुरी म्हणजे लाकडाचा मोठा वासा ज्याच्या मदतीने रथाचे नियंत्रण केले जाते. धुरी ओढण्यासाठी धुरंधर नेमलेले असतात. धुरंधर हे व्यायाम शाळेमध्ये जाऊन शरीराची जोपासना केलेले असे मल्लपटू असतात. धुरीवर असलेले धुरंधर हे नाड्यांवर असलेल्या २०० सेवेकऱ्यांच्या ताकदीला योग्य असे नियंत्रण ठेवून रथाला उजवीकडे किंवा डावीकडे मार्गस्थ करायला आपले कसब पणाला लावतात

सेवेकरी आखाडे आणि व्यायामशाळा :-
रास्ते आखाडा आणि अहिल्याराम व्यायामशाळा यांच्या प्रमाणेच नाशिक नगरी मधील रोकडोबा तालीम संघ, गुलालवाडी व्यायाम शाळा, ओकाची तालीम संघ, मोहन मास्तर तालीम संघ, यशवंत व्यायाम शाळेचे मल्लपटू रथाच्या सेवेत टप्प्या टप्प्या वर कार्यरत असतात.

बंडू दीक्षित :-
गरुड रथाचे मानकरी आणि अहिल्याराम व्यायामशाळेचे व्यवस्थापन ज्यांच्या कडे असते असे दीक्षित घराण्यातील धुरंधर, जे रथाच्या सेवेत नेहमीच धुरीवर असायचे, गरुड रथ जेव्हा राम सेतू पुलाकडून रथ कपूरथळा मैदानाकडे जेव्हा वळत असतो तेव्हा त्या उतारावर अपघातात बंडू दीक्षित यांचे गरुड रथाच्या चाकाखाली निधन झाले. तेव्हा पासून आजतागायत त्या ठिकाणी बंडू दीक्षित यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

गरुड रथ मार्गक्रमण करून आल्यावर रामसेतू पुलाखाली कपूरथळा येथे भाविकांच्या दर्शनासाठी थांबतो. आणि रसपानानंतर गरुड रथ हा राम रथाच्या दिशेने वाटचाल करतो. तिथून मग दोन्ही रथ हे रामतीर्था कडे सरदार चौक मार्गे मार्गस्थ होतात. रामतीर्थावर पोहचल्यावर रथामधील देवांना बुवांच्या हस्ते अवभृत असे स्नान होते. अवभृत स्नान म्हणजे महान्यास युक्त स्नान ,असे स्नान, पुरुषसूक्तांचे १६ आवर्तनांचा रामांवर अभिषेक येथे होत असतो, श्रीसूक्ताचे १ आवर्तनाचा अभिषेक येथे होत असतो, त्यानंतर रामाच्या उत्सव मूर्तींना राम तीर्थात
नेऊन स्नान घातले जाते. ह्या उत्सवमूर्तीना नंतर रामतीर्थ तीरावर जमलेल्या सर्व समाजाच्या आणि जातीच्या लोकांच्या हस्ते, आपल्या हाताच्या ओंजळीने प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माईंच्या मूर्तीना स्नान ह्या दिवशी घालता येते आणि नंतर पूजाआरती होऊन प्रभु श्रीरामांच्या उत्सव मूर्ती आणि पादुका ह्यांना रथा मध्ये विराजमान करून पुढचा प्रवास सुरु होतो. नंतर दोन्ही रथ भगवान कपालेश्वर च्या समोरून मालवीय चौकाकडून, शनी चौक मार्गे, काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाज्या मार्गे, आणि तिथून पुढे चंद्र मौलेश्वर मंदिर पासून पुन्हा काळाराम मंदिरचा पूर्व दरवाजा येथे दोन्ही रथ येतात.

दोन्ही रथातील देवांना पुन्हा रथातून खाली उतरवून पालखीत विराजमान केले जाते. पुन्हा मंदिराच्या मूळ

गाभाऱ्यामध्ये दोन्ही देवता मूर्ती आणि पादुका आणल्या जातात आणि नंतर देवांची आरती होते, प्रसाद होतो. रथ मूळ त्याच्या मूळ जागेवर येईपर्यंत पहाट झालेली असते आणि त्या वेळेही लोक त्याच उत्साहाने सहभागी असतात. अश्या प्रकारे दरवर्षी नाशिकचा रथोत्सव साजरा करण्यात येतो. मोलाचे सहकार्य :- नरेश पुजारी (गुरुजी)

रथ यात्रा दु. ४.०० वा.
चैत्र शु ११ कामदा एकादशी. दि. १९ / ४ / २०२४

गरुड रथाचे मार्गक्रमण :-
काळाराम मंदिर पूर्वदरवाजा, नागचौक, हत्ती पूल. जूना आडगाव नाका गणेशवाडी, रोकडोबा मारुती, नेहरुचौक ,वंदेमातरम चौक, मेनरोड ,बोहोरपट्टी ,सराफबाजार ,कापडबाजार, बालाजीकोट, कपूरथळा मैदान, गाडगेमहाराज पूल, म्हसोबा पटांगण, रामसेतू , सरदारचौक ,अहिल्याराम व्यायाम शाळा , रामतीर्थ घाट येथे अवभृत स्नान ,पूजा ,विश्रांती ,नंतर कपालेश्वर मालवीयचौक ,शनिचौक, कार्तिकस्वामी मंदिर ,उत्तरदरवाजा काळाराम मंदिर, येथे समाप्ती,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *