नाशिक :- नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट-२ ने कार्यवाही करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.
गुरनं. ३७४/२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (२) ३३१ (३) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, संशयित अजय गुरमितसिंग गुप्ता याला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे, पोहवा प्रकाश महाजन, व अन्य पथकाने संशयिताची सखोल चौकशी केली.
तांत्रिक बाबींची पडताळणी व घटनास्थळाच्या निरीक्षणानंतर अजय गुप्ता याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा मोटरसायकल असा एकूण ०६,२१,५६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे आणि पोलीस पथकाने केली आहे.