नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कडक सुरक्षा व्यवस्थापन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चेक पोस्ट आणि नियमित तपासणीद्वारे अवैध माल जप्त करण्यात येत आहे.
आजवर 49 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे, ज्यात 6 कोटी 53 लाखांची रोख रक्कम, 52 अग्निशस्त्रे, 89 काडतुसे, 153 घातक शस्त्रे, 5 कोटी 75 लाखांची अवैध दारू, गांज्याचे साठे, आणि मौल्यवान दागिने यांचा समावेश आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात 23 कोटी 72 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जप्ती झाली, तर जळगाव जिल्ह्यात 1 कोटी 45 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी 16,891 सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली असून, 12 जणांना MPDA अंतर्गत ताब्यात घेतले आहे. पाच जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पोलीस दलाच्या 84 प्लाटून तैनात आहेत, ज्यामुळे शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राखले जात आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही अवैध हालचालींची माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.