नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन
नाशिक : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ, तसेच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महिला पत्रकारांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” अशी अत्यंत अश्लील व विनयभंग करणारी भाषा वापरली. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमांतर्गत वामन म्हात्रे यांच्यावर विनयभंग व पत्रकारास धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
या निवेदनावर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील, जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सौ. सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, कार्यकारणी सदस्य राकेश पाटील, दिनेश पगारे आणि संतोष शिंदे यांची स्वाक्षरी आहे.
पत्रकार संघटनांनी म्हात्रे यांच्या अश्लील वर्तनाचा निषेध करत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.