नाशिकरोड :- ” डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती त्यापासून वंचित असतात. अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयव दान, रक्तदान आणि नेत्रदानाला आज फार महत्व आहे. धनदान अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली तर आयुष्यात आपल्याला कर्तबगारिने दाता खूप मोठा होईल व मोठे समाजकार्य घडेल. मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती नेत्र पीडित जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला की मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल, ” असे मार्गदर्शन करताना डॉ. सारंग दराडे यांनी सांगितले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थी सभा व आयएमए नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘ अवयवदान जनजागृती कार्यक्रम ‘ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते . याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. धवल चोकसी, बिटको हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसर डॉ. कांचन लोकवाणी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. धवल चोकसी यांनी अवयव दान श्रेष्ठदान या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्याच्या जीवनात आनंद आणू शकतो. अवयवदाना बाबत लोकांमध्ये, युवकांमध्ये जनजागृती व्हावी व त्याद्वारे अनेकांना नवीन जीवन मिळवून देऊया. अवयव दान हे जिवंत असताना आणि मृत्यूनंतर अशा दोन्ही वेळा करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर ८ जणांचे जीवन आनंद बनवू शकतो. तेव्हा अवयवादानासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे सांगितले. जगताजगता रक्तदान, जाता जाता अवयव दान आणि गेल्यानंतर नेत्रदान देहदान करा असा जनजागृतीच्या संकल्प विद्यार्थ्यांनी करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा वाघ यांनी केले तर आभार भूषण खोतकर यांनी मानले. तांत्रिक सहाय्य योगेश काळे व राहुल पाटील यांनी केले.