नाशिक : साई धनवर्षा फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना “समाजरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित केला जातो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रामराव मोतीराम शिंदे (ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रोप्रायटर, विकास इंटरप्राईजेस, नाशिक), डॉ. आशा मदन पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती, नाशिक), सौ. सारिका संजय देशमुख (खजिनदार, साई धनवर्षा फाउंडेशन, नाशिक) आणि सौ. कावेरी गोविंद घुगे (मा. नगरसेविका व सभापती, बालकल्याण विभाग, नाशिक) उपस्थित होते.
सन्मानित महिलांमध्ये विशेष उल्लेखनीय सहभाग असलेल्या काही प्रमुख व्यक्तींमध्ये डॉ. ज्योती केदारे शिंदे (ग्रामपंचायत अधिकारी व मिसेस युनिव्हर्स विनर २०२४), श्री. राधाकृष्ण नाईकवाडे (संचालक, श्री समर्थ सहकारी बँक लि.), श्री. ज्ञानेश्वर आर. वरपे (डायरेक्टर, ऑल महाराष्ट्र रोडलाईन्स), श्री. विश्वनाथ किसन किरकिरे (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस), तसेच राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, सौ. माधुरी प्रभाकर कुळकर्णी, डॉ. चेतना सेवक आणि सौ. शिल्पा संतोष झारेकर यांचा समावेश होता.
या सोहळ्यात विविध शहरांतील, जसे की नागपूर, वर्धा, धुळे, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, तसेच गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. फाउंडेशनतर्फे या वेळी दोनशे एक महिलांना निशुल्क पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना आहेर आणि अश्विनी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बबलू सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांचा सत्कार केला आणि त्यांनी आपल्या मनोगतांद्वारे महिलांचे कौतुक केले.