श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर कमी केल्याने नाशिकसह देशातील कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे श्रीलंकेत भारतीय कांद्याची निर्यात वाढण्याची शक्यता असून, शेतकरी आणि निर्यातदार यांना चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा आहे.
दरवर्षी भारतातून श्रीलंकेत साधारणतः दीड ते दोन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. मात्र, आयात शुल्कामुळे गेल्या काही काळात निर्यातीवर मर्यादा आल्या होत्या. आता हा अडथळा दूर झाल्याने निर्यात पुन्हा गती घेईल. २०२३ मध्ये भारताने श्रीलंकेत ४१४ कोटी रुपयांचा १ लाख ७३ हजार ७५४ मेट्रिक टन कांदा निर्यात केला होता.
फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले की, या निर्णयाचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर व्यापारी, मजूर आणि जहाज कंपन्यांनाही होईल. आर्थिक उलाढाल वाढण्याबरोबरच श्रीलंकेतील बाजारपेठेतील मागणी पूर्ण होईल.
लासलगाव बाजार समितीत सध्या नवीन लाल कांद्याची आवक सुरू असून, मंगळवारी २१ हजार २३८ किंटल कांद्याची नोंद झाली. लाल कांद्याला जास्तीत जास्त ₹५,३५२ प्रति क्विंटल आणि सरासरी ₹३,७५१ प्रति क्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक संपल्याने बाजारात कांद्याचा पुरवठा कमी आहे, मात्र मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत.
श्रीलंका सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा आहे आणि भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक वाव मिळणार आहे.