निफाड तालुक्यातील वाहेगाव येथे 20 वर्षीय रोहित लहाणू पवार याचा मृतदेह गोई नदीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित 3 नोव्हेंबर रोजी सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही.
कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर लासलगाव पोलिसांनी तपास सुरू केला. शोधादरम्यान, गोई नदीच्या काठावर त्याचे दप्तर सापडले. यानंतर नदीत शोध घेतला असता, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्याचा मृतदेह सापडला.
लासलगाव पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, स.पो.नि. बी.जे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंत हेंबाडे अधिक तपास करत आहेत. युवकाच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्यासाठी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.