नाशिक: नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्षा वंदना पंडित पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या विविध योजना आणि संकल्पांची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहकार्याने 2024 विधानसभा निवडणुकांसाठी या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
या योजनांमध्ये महिलांसाठी वर्षाला 6 मोफत गॅस सिलेंडर, मोफत प्रवास, प्रति महिना 3000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सुशिक्षित बेरोजगार युवकांना 4000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. याशिवाय शेतकऱ्यांसाठी 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 25 लाखांपर्यंत आरोग्य विम्याचा समावेश आहे.
महिला सुरक्षेसाठी निर्भया कायदा अधिक प्रभावीपणे लागू करण्याचे काँग्रेसचे आश्वासन असून, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपा सरकारच्या काळात महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, काँग्रेस सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध राहील असे वंदना पाटील यांनी सांगितले.
महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांवर मात करण्यासाठी काँग्रेस सरकार प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत ज्युली डिसोझा, वनिता मुळाणे, शितल महाजन, ललिता खांडवी, अरुणा खैरणार यांसह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.