आडगावमध्ये महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यांनी ठाम शब्दात सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण न घेता बाहेरील धनाढ्य लोकांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना नडणाऱ्यांना आडगावकर जागा दाखवतील.
आडगावातील मारुती मंदिरापासून या रॅलीची सुरुवात झाली, आणि यावेळी ॲड. ढिकले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. ढिकले यांची प्रचार रॅली खासदार शरद पवार यांच्या सभेपूर्वीच आडगावात होत असल्याने, यामुळे विरोधकांची कोंडी झाल्याचे दिसून आले.
प्रकल्पांसाठी ढिकलेच हवे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. भाजपा सरकारच्या कार्यकाळात सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा झाली असून, आडगावपासून हा महामार्ग जात आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने याच भागात लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्याची घोषणा केली आहे. ढिकले यांच्या कारकिर्दीत महापालिकेने आयटी पार्क मंजूर केला असून, त्यामुळे आता या प्रकल्पांना गती देण्यासाठी ढिकले यांचे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे नगरसेविका शीतल माळोदे, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे आणि इतरांनी सांगितले.
या प्रचार रॅलीत उद्धव निमसे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, पुंजाभाई माळोदे, भिकाजी शिंदे आणि आडगावचे अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.