शनिवार, ९ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुंबईहून नांदेडला जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस कसारा स्थानकाजवळील सिग्नलजवळ उभी असताना एका बोगीच्या खाली अचानक आग लागली. आग लागताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. रेल्वे प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली.
या घटनेचे नेमके कारण असे की, नंदिग्राम एक्सप्रेस एका सिग्नलजवळ उभी असताना एका बोगीच्या कॉम्प्रेसरच्या बाजूने धुर येऊ लागला आणि त्यानंतर केबलने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. शुभम धोंगडे आणि अन्य सदस्यांच्या मदतीने फायर सिलेंडर व मातीचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली.
घटनेमुळे काही काळ रेल्वे गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली आणि नाशिककडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या सुमारे एक तास उशिराने धावत होत्या. आग आटोक्यात आल्यावर, रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणी करून गाडी सुरक्षित असल्याची खात्री केली. यानंतर नंदिग्राम एक्सप्रेसला इगतपुरीकडे मार्गस्थ करण्यात आले.