नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. शनिवारी (३० नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली असून, यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
सुरेश तुकाराम रणसशिंग (रा. अंबाजीनगर, आरटीओ कॉर्नर, पंचवटी) हे आपल्या पत्नीसोबत सकाळी ११ च्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आले होते. नाशिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना अचानक गर्दी झाली. त्या गडबडीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली.
सदर प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. महत्त्वाच्या दागिन्यांची काळजी घेऊन चोरट्यांच्या लक्ष्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे