नाशिक शहरात तापमानाचा पारा कालच्या ८.५ अंशांवरून आज ३ अंशांनी वाढून ११.५ अंशांवर पोहोचला आहे, तर कमाल तापमान २८ अंशांवर स्थिर आहे. येत्या काही दिवसांत किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फिंजल’ चक्रीवादळ काल तामिळनाडूच्या पाँडिचेरीजवळ आदळल्यानंतर कमकुवत होत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर चक्रीवादळाच्या आर्द्र वाऱ्यांमुळे अटकाव झाल्याने वातावरणात दमटपणा वाढणार आहे. त्यामुळे चंपाषष्टीपर्यंत (७ डिसेंबर) तापमानात वाढ होणार असून, आठवडाभर थंडी कमी होईल. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये थंडी कायम राहील. दि.८ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात थंडी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.