नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट लढत रंगली आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठून शक्तिप्रदर्शन केले होते. अखेर दुसऱ्या यादीत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिकमधील वाढता ड्रग्ज व्यापार आणि गुन्हेगारीसाठी देवयानी फरांदे जबाबदार आहेत,” असा थेट आरोप करत, गिते यांनी शहर भयमुक्त आणि व्यसनमुक्त करण्याचे वचन दिले आहे. त्यांनी फडणवीस सरकारवरही टीका करताना, “नाशिकला भाई आणि ड्रग्ज व्यापाऱ्यांच्या ताब्यात सोडण्यात आले,” असे म्हटले आहे.
महिला कार्यकर्त्यांचे औक्षण आणि फरांदे यांचा विश्वास
दरम्यान, सलग दोन टर्म नाशिक मध्यचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. “दहा वर्षांत केलेल्या कामाची पावती मतदार देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्दे
- देवयानी फरांदे यांचे ड्रग्ज आणि गुन्हेगारीवरून वसंत गितेंकडून गंभीर आरोप
- फरांदे विरुद्ध गिते: नाशिक ‘मध्य’मध्ये थेट मुकाबला
- मतदारांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी मांडले आपले मुद्दे