नाशिक: “जल है तो जीवन है” या उक्तीला यंदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील बळीराजाने अनुभवले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवत २७ टक्के अधिक पाऊस बरसवला आहे, ज्यामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी बांधवांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठे नुकसान होत असे, मात्र यावर्षी पावसाने शिस्तबद्धपणे हजेरी लावल्याने जिल्ह्यातील जलसंकटावर मात करण्यात यश आले आहे. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९००.४ मिमी म्हणजेच ९६.२ टक्के पावसाची नोंद झाली, तर मागील वर्षी हे प्रमाण ६४२.५ मिमी म्हणजे ६८.७ टक्के होते. नाशिक विभागातदेखील यावर्षी १११.४ टक्के पाऊस पडला, जो मागील वर्षीच्या ७६.८ टक्क्यांपेक्षा मोठ्या फरकाने अधिक आहे.
यंदा धरणांमध्ये मुबलक पाणी साठल्यानंतर गोदावरी नदीच्या काठावरील काही भागांमध्ये पाण्याच्या विसर्गामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र प्रत्यक्ष पूर आला नाही. त्यामुळे जनजीवन सुरक्षित राहिले. जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुरळीत असून शेतकऱ्यांना या पावसामुळे शेतीच्या दृष्टीने मोठा फायदा झाला आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान टाळत, यावर्षी पर्जन्यराजाने शिस्तबद्ध पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये भरीव वाढ करून, जलसंकट टाळण्यात मोठे योगदान दिले आहे.