नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमात गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या शिकवणीचे महत्त्व सांगितले. तसेच, लालबहादूर शास्त्री यांच्या “जय जवान जय किसान” या मंत्राचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शास्त्रीजींच्या साधेपणाचे कौतुक करत, त्यांच्या मेहनतीला प्रार्थनेच्या समान असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांची विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी “बेस्ट फ्रॉम वेस्ट” कलाकृती सादर केली.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, प्रा. विजय सुकटे आणि इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी विकास मंडळातर्फे स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आले.