संयुक्त किसान मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सोमवारी सकाळपासून नोएडामधून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढत निघाले, त्यामुळे नोएडामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर पोलिस आणि आरएएफ तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या प्रमुख सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. नोएडा ट्राफिक पोलिसांनी वाहतुकीसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
शेतकऱ्यांनी ५ कलमी मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे:
- जुन्या भूसंपादन कायद्यानुसार बाधित शेतकऱ्यांना १०% भूखंड आणि ६४.७% वाढीव भरपाई मिळावी.
- १ जानेवारी २०१४ नंतर संपादित जमिनींसाठी बाजारभावाच्या चौपट मोबदला व २०% भूखंड द्यावा.
- जमीनदार व भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार व पुनर्वसनाचा लाभ मिळावा.
- उच्चाधिकार समितीच्या शिफारसींनुसार शासन आदेश काढावेत.
नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरजवळ शेतकरी दुपारी १२ वाजता जमणार असून, ग्रेटर नोएडाच्या परी चौकातून काही संघटना ट्रॅक्टर ट्रॉलीसह मोर्चात सहभागी होणार आहेत. या शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे दिल्लीच्या प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तोडगा निघावा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.