महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
पुण्यातील किमान तापमान 10 अंशांवर पोहोचल्याने थंडीने कहर केला आहे. बुधवारी शहरात निरभ्र आकाश असले तरी थंड वाऱ्यामुळे वातावरण गारठलेले राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून, सकाळच्या वेळेस धुक्याचे सावट जाणवले आहे.
मुंबई आणि कोकण भागातही तापमानाचा पारा खाली आला असून, 27 नोव्हेंबरला मुंबईचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे. विदर्भात ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे थंडीचा अधिक प्रभाव जाणवत आहे. नागपुरातील तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी फवारणीसह योग्य उपाययोजना करावी, असे कृषीतज्ज्ञांनी सुचवले आहे. थंडीमुळे लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात असून, शहरी भागातही लोक गरम कपड्यांचा वापर करत आहेत.
तापमानाचा अंदाज:
- पुणे: किमान 10°C, कमाल 28°C
- छत्रपती संभाजीनगर: किमान 11°C, कमाल 28°C
- नागपूर: किमान 13°C, कमाल 30°C
- मुंबई: किमान 17°C, कमाल 33°C
राज्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामान कमी होऊन कोरडे वातावरण राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.