नाशिक: सुरगाणा तालुक्यातील बा-हे गावात दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास बा-हे येथील सुनिल राऊत यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाट आणि देवघरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. चोरीत एकूण ₹13,76,775 किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
घटनेनंतर बा-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिस्खेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विशेष सूचना दिल्या.
तांत्रिक तपासणी आणि सराईत गुन्हेगारांच्या नोंदींच्या आधारे आरोपी अरुण अंकुश दाभाडे याला नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले 17 तोळे सोन्याचे दागिने (किंमत ₹4,11,775) आणि ₹2,80,635 रोख रक्कम असा एकूण ₹6,92,410 किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
आरोपी अरुण दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून त्याच्या आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
पथकातील अधिकारी आणि कर्मचारी:
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि किशोर जोशी, सोपान राखोंडे, आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वी केली. या तपासात सपोनि शिवाजी ठोंबरे, पोलीस कर्मचारी नवनाथ सानप, सचिन देसले, सुधाकर बागुल, आणि इतरांचा विशेष सहभाग होता.
या प्रकरणामुळे सुरगाणा परिसरातील रहिवाशांमध्ये पोलीस यंत्रणेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.