नाशिक – भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विकासाच्या दिशेने घेतलेली ठोस पावले आणि ‘माझं नाशिक, माझी जबाबदारी’ या ब्रीदाचे कटाक्षाने पालन केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे. विविध समाजघटकांनी त्यांना समर्थनपत्रे देत त्यांची उमेदवारी जाहीरपणे समर्थित केली आहे.
श्री संत सावतामाळी समाजमंदिराचे अध्यक्ष गोविंद विधाते यांच्या नेतृत्वाखालील समाजाने फरांदे यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला आहे. फरांदे यांनी समाजमंदिरासाठी २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला, ज्यामुळे समाजाने त्यांना ‘कार्यसम्राट आमदार’ ही पदवी बहाल केली आहे.
तसेच, समस्त चर्मकार समाज, अखिल भारतीय मातंग संघ, आणि भोई समाज पंच ट्रस्टसह इतर संस्थांनी देखील आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. फरांदे यांनी विविध समाज संस्थांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजमंदिर, मठ, धर्मशाळा आणि युवकांसाठी तालमींचे बांधकाम मार्गी लागले आहे.
अखिल भारतीय वनमाळी समाजाने देखील फरांदे यांचे कार्य कौतुकास्पद मानत त्यांना पाठिंबा दिला. जातीयतेविरुद्ध वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्यामुळे नाशिकमध्ये शांतता राखण्यात यश आल्याचे वनमाळी समाजाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
फरांदे यांच्या प्रचारात स्त्री-पुरुष, युवक-युवती, तसेच नवमतदार उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, त्यांच्या विकासपर्वाला सर्व स्तरांतून वाढता पाठिंबा मिळत आहे.