विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकप्रतिनिधींना फसवून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दिल्लीतील दोन आरोपींना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. “प्रमोद मिश्रा” नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील प्रिन्सिपल सेक्रेटरी असल्याचे भासवून नाशिक व इतर विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते.
प्रमोद मिश्रा यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे बनावट पत्र दाखवून 50 लाख रुपये न दिल्यास राज्यभरात बदनामी करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त श्री. प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त श्री. संदिप मिटके, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने दिल्लीमध्ये शोधमोहीम राबवली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सर्वेश मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनु (गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि गौरव नाथ (दिल्ली) यांना अटक करण्यात आली.
दिल्लीतील स्पेशल सेलमध्ये आधीच गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना प्रथम दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पो. हवा. प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, शरद सोनवणे, आणि जगेश्वर बोरसे यांच्या सहभाग असलेल्या गुन्हे शाखा युनिट 1 पथकाचे विशेष योगदान राहिले.