नांदगाव: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर नांदगाव मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. जातीय समीकरणांनी व्यापलेल्या या मतदारसंघात मराठा, ओबीसी, दलित, आणि मुस्लिम समाजाचे वर्चस्व असून, त्यांच्या मतांवरच या लढतीची दिशा ठरणार आहे.
आ. सुहास कांदे यांचे शिवसेनेत वर्चस्व
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमधील शिवसृष्टीच्या उद्घाटनाच्या वेळी कांदेंना दुप्पट मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले होते. कांदे यांच्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे.
भुजबळ कुटुंबाचे पुनरागमन?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. पंकज भुजबळ यांनी विधान परिषदेवर जाण्याच्या निर्णयानंतर समीर भुजबळ यांना नांदगाव विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याची तयारी चालवली आहे. समीर भुजबळ हे मागील काही काळापासून मतदारसंघात सक्रिय झाले आहेत, आणि त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निश्चित होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांच्या जोरदार तयारीची चर्चा
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे सुपुत्र गणेश धात्रक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी नांदगावमध्ये गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी केली आहे आणि मतदारसंघातील गावागावांत प्रचार सुरू केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही धात्रक यांच्याविषयी सकारात्मक इशारा दिला आहे.
इतर इच्छुकांच्या प्रवेशामुळे तणाव
काँग्रेसकडूनही निवडणुकीत सक्रियता दिसत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे, तर मराठा समाजाकडून देखील उमेदवारांची चर्चा सुरू आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनीही आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी साकोरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
नांदगावात चौरंगी लढत निश्चीत
नांदगाव मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), महाविकास आघाडी, काँग्रेस, आणि स्वतंत्र उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. जातीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्द्यावर आधारित ही निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.