महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट झाले. सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवून शांततेचा संदेश दिला आहे.
शपथविधीचा सोहळा आझाद मैदानात होईल, असे संकेत मिळत असून शिवाजी पार्क, रेसकोर्स आणि ब्रेबॉर्न स्टेडियम यांसारख्या पर्यायांचीही पाहणी सुरू होती. मात्र, महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा विचार करून आझाद मैदान हे अंतिम ठिकाण निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.