नाशिक – निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे.
गहू आणि हरभरा पिकांसाठी ही थंडी लाभदायक ठरत असली, तरी द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेकोट्या पेटवून थंडीपासून बागांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, कांदा पिकावरही या थंडीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.