नाशिक – देवळाली कॅम्प आणि उपनगर परिसरात मागील दोन दिवसांपासून जबरी लूटमार आणि दहशत माजवणाऱ्या आठ जणांच्या दरोडेखोर टोळीची ओळख पटली असून, उपनगर पोलिसांनी अलर्ट कॉलनंतर तिघांना पाठलाग करून अटक केली आहे. मात्र, इतर पाच जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गावठी कट्टा, धारदार शस्त्र, दोरी, आणि मिरची पूड जप्त करण्यात आली आहे.
स्वप्निल उर्फ भूषण सुनिल गोसावी, दानिश हबीब शेख, आणि बबलु रामधर यादव (वय २१, रा. सुंदरनगर) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच फरार असलेल्या संशयितांमध्ये सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे, आणि रोहित लोंढे उर्फ भुऱ्या यांचा समावेश आहे.
शुक्रवारी (दि. २२) रात्री सव्वा नऊच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील भैरवनाथ मंदिराजवळील दुकान बंद करून रोचनदास चोहितराम सचदेव (वय ७०) हे आयट्वेंटी कारमधून घरी जात असताना, या टोळक्याने दुसऱ्या आयट्वेंटी कारने त्यांची गाडी अडवली. हातोडी आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवत वाहनाच्या काचा फोडून २५ हजारांची रोकड जबरीने लुटली. यावेळी झालेल्या हल्ल्यात सचदेव यांच्या हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली.
यानंतर, रात्री साडेदहाच्या सुमारास देवळाली गावातील जाधव मळा परिसरातील सुवर्ण सोसायटीत या टोळक्याने पुन्हा थैमान घातले. तेथे ऑफिसमध्ये गप्पा मारत असलेल्या चार तरुणांवर कट्टा दाखवत पाच हजार रुपये लुटले, मारहाण केली, तसेच ऑफिसचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, आणि वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुयोग वायकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. फरार संशयितांचा शोध सुरू असून, या टोळीकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे देवळाली कॅम्प आणि उपनगर भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयितांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पथक सक्रिय झाले आहे.