google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी

author
0 minutes, 1 second Read

आपला महाराष्ट्र वृत्त:-

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम येणाऱ्या काळात घोषित होणार आहे. या निवडणुकीवेळी उमेदवार / राजकीय पक्ष यांनी सोशल मीडियावर प्रचार करताना मा. भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी सूचित केले आहे. याबाबत दिलेल्या सूचनांनुसार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना अर्जात त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेला जाहिरातींवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशोबात दाखविणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश याबाबत आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत. इलेक्ट्रॅानिक मीडियावर करावयाच्या प्रचार जाहिरातीसाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची ( Media Certification and Monitoring Committee) मान्यता घेवूनच अशा जाहिराती प्रसारीत करणे आवश्यक आहे.

याकरिता जिल्हास्तरावर सदर समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर राहणार आहे.जिल्हास्तरावर मीडिया सेल कार्यान्वित करण्यात येत असून पोलिस सायबर विभागाचे तज्ज्ञ अधिकारी या सेलमध्ये कार्यरत असणार आहेत. या सेलचे सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीवर लक्ष असेल. सोशल मीडियाद्वारे मानहानीकारक संदेश पाठवणे, धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणारे, भावना भडकावणारे, समाजातील शांतता, एकोप्यास तडा देणारे विघातक संदेश पाठवणे आदि समाजविघातक बाबींवर या सेलचे विशेष लक्ष असेल. राजकीय पक्ष व उमेदवारांनी इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रचारावरदेखील आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू आहेत ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदारांना जात, धर्मावर आधारित मतदान करण्याबाबत आवाहन करता येणार नाही. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, पूजास्थळांचा वापर निवड़णूक प्रचारासाठी करता येणार नाही. सोशल मीडियावरून करण्यात येणाऱ्या जाहिरातीद्वारे वाईट भाषा आणि मानहानीकारक भाषा वापरून निवड़णूक प्रचार करता येणार नाही याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी सूचित केले आहे.जिल्ह्यातील मतदारांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या विघातक जाहिराती, जनतेत तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या संदेशाकडे लक्ष न देता सद्सद्‌विवेकबुध्दीने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूकअधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *