google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

author
0 minutes, 0 seconds Read

 नियमित योग साधनेतून आरोग्य उत्तम राखता येते आणि त्यातून सुखी जीवनाचा मार्गही गवसतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. 21 जून) केले. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमात ना. श्री. गडकरी यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या नागपूरकरांसोबत योगासने केली. यावेळी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष व योगगुरू रामभाऊ खांडवे, सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदींची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘मी स्वतः कितीही व्यस्त असलो तरी दररोज दोन तास न चुकता योगासने आणि प्राणायाम करतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. प्रत्येकाने आपल्या आरोग्याला पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्य उत्तम असेल तरच सुखी जीवनाचा मार्ग सापडतो. म्हणूनच आज संपूर्ण जगात योग आणि प्राणायाम करण्याला मान्यता आहे.’ आज नागपुरात अनेक योग शिक्षक योगासनाचे क्लासेस घेतात आणि त्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर यांनी आभार मानले.

क्रीडापटूंचा सन्मान
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. वैभव श्रीरामे , हर्षल चुटे,छकुली सेलोकर, तेजस्विनी खिंची, यज्ञेश वानखेडे, खुश इंगोले, वैभव देशमुख, रचना आंबुलकर, अलिशा गायमुखे, ओम राखडे, प्रणय कंगाले, श्रावणी राखुंडे, निसर्गा भगत, मृणाली बानाईत, श्रीराम सुकसांडे या क्रीडापटूंना ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्व. भानुताई गडकरी संस्थेतर्फे नेत्र तपासणी
स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने योग दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम परिसरात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. यावेळी चष्म्यांचे देखील वाटप करण्यात आले. अनेक पोलिसांनी देखील नेत्र तपासणी करून घेतली. शिबिराला योगगुरू रामभाऊ खांडवे, आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी मान्यवरांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *