नाशिक – नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी गुंडगिरी व दहशतीला रोखणे आवश्यक असून, या उद्देशाने मतदारांनी भाजप महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी केले. आज सकाळी सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरातून सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केले की, मागील दशकभरात हिरे यांनी सिडको, सातपूर, इंदिरानगर परिसराच्या विकासासाठी घेतलेली मेहनत लक्षात घेता, त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणे आवश्यक आहे.
सीमा हिरे यांच्या प्रचारात सिडकोतील संभाजी स्टेडियम, अश्विननगर, सह्याद्री नगर, सिंहस्थनगर, अंबड पोलीस स्टेशन परिसर, मोरवाडी गाव, पंडितनगर आदी भागातून उत्स्फूर्त प्रचारफेऱ्या काढल्या गेल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी सीमा हिरे यांचे स्वागत केले, तर गल्लीतून स्वयंप्रेरित नागरिक या फेरीत सहभागी झाले.
प्रचारफेरीत सीमा हिरे यांच्यासह मामा ठाकरे, दिलीपकुमार भामरे, चंद्रकांत खाडे, श्याम कुमार साबळे, संजय गुंजाळ आदी महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले. या रॅलीनंतर सीमा हिरे, महायुतीचे कार्यकर्ते व १७ हजार नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीत होणाऱ्या जाहीर सभेसाठी जमले. मोदींच्या सभेत भाजप, महायुती आणि सीमा हिरे यांच्या विजयाचा जयघोष केला गेला, ज्यात मतदारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.