पुणे :- 15 सप्टेंबर 2024, रविवार रोजी पिंपरी चिंचवड येथील शिवाजी पार्क संभाजीनगरमधील हर्षधन विला येथे कलाकारांच्या हिताचे मुद्दे आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर तसेच कलाकारांच्या उपजीविकेच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली.
या बैठकीचा मुख्य उद्देश्य सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना त्यांच्या हक्काचे योग्य मानधन मिळवून देण्याचा होता. या अनुषंगाने, लवकरच कलाकारांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उभारले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवले जातील व विविध योजनांचा लाभ कलाकारांना मिळवून देण्यात येईल.
बैठकीत उपस्थित असलेले मान्यवर कलाकार मंगेश शिरसाठ, बलराम पवार, सचिन राठोड, अपूर्व बागुल आणि इतरांनी कलाकारांच्या कामाचे तास, मानधन आणि सिरीयल्सचे तीन महिन्यांनी मिळणारे मानधन यावर चर्चा केली.
बैठकीत महिला कलाकारांपैकी अर्पिता खंडू शिवणेकर, सारिका शिवणेकर यांनीही कलाकारांच्या हितासाठी आपली मते मांडली. पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.