राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २०, शिवसेना (शिंदे गट) चे १२, आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ९ मंत्री असतील. सरकार स्थापनीनंतर खातेवाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय झाला असून जय्यत तयारी सुरु आहे.
महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त होत आहे.