राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातूनही महत्त्वाच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे.
येवला मतदारसंघात छगन भुजबळ पिछाडीवर
येवला मतदारसंघात महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांना तगडा लढा मिळत असून दुसऱ्या फेरीच्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे १,३०० मतांनी आघाडीवर आहेत.
मालेगाव बाह्य आणि मध्य मतदारसंघातील स्थिती
मालेगाव बाह्य मतदारसंघात मंत्री दादा भुसे ८,७१३ मतांनी आघाडीवर असून विजयाचा दावा मजबूत करत आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात अपक्ष उमेदवार रशीद शेख ३,५४० मतांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे येथील लढत चुरशीची बनली आहे.
नांदगाव आणि बागलाणमधील चित्र
- नांदगाव मतदारसंघात पहिल्या फेरीत सुहास कांदे ६,५१५ मतांनी आघाडीवर आहेत. समीर भुजबळ यांना २,५८३ मते मिळाली असून ते पिछाडीवर आहेत.
- बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे ३,८२२ मतांनी आघाडीवर आहेत, तर दीपिका चव्हाण २,७५९ मतांवर थांबल्या आहेत.
नाशिक शहरातील लढती
- देवळा मतदारसंघात अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आघाडीवर आहेत.
- नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, आणि नाशिक पश्चिममधून सीमा हिरे आघाडीवर आहेत.
राज्यात निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, मात्र नाशिकमधील चुरशीच्या लढतींनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.