राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागांचे स्पष्ट बहुमत मिळेल आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
महाविकास आघाडीचा विश्वास
संजय राऊत म्हणाले की, “राज्यभरात ६५% हून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने पैशाच्या जोरावर नव्हे, तर स्वाभिमान व महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावर मतदान केले आहे. २३ तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार असून २६ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार शपथविधी करेल. मुख्यमंत्री कोण होईल हेही निकालानंतर लगेच स्पष्ट केले जाईल.”
एक्झिट पोलवर राऊतांचा हल्लाबोल
मतदानोत्तर चाचण्यांवर टीका करत राऊत म्हणाले, “एक्झिट पोल हे लोकशाहीतील मोठा फसवणूक प्रकार आहे. लोकांचे मत गुप्त असते. त्यामुळे कोण जिंकणार याचा अंदाज लावणे अशक्य आहे. हरयाणात आणि लोकसभेतही एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही.”
भाजपच्या संधीवर प्रश्नचिन्ह
भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावा करत राऊत म्हणाले, “भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या येतील की कुलुप, हे ७२ तासांत कळेल. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेचा पैशाचा वापर फेटाळून लावला आहे. जनतेच्या मताने महाराष्ट्राचा अभिमान जपला जाईल.”
सत्तास्थापनेचे चित्र २३ तारखेला स्पष्ट होणार
विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. राज्यातील प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत झाली आहे. आता सर्वांचे लक्ष २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीवर केंद्रित आहे.