नाशिक (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नाशिक मध्य मतदारसंघात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अंकुश पवार यांनी माघार घेतल्याने महायुतीच्या भाजप उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. काल (दि. ७) फरांदे यांनी मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये नाशिक मध्य मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, आणि यंदाही ही परंपरा कायम राहील, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसोबत एकजुटीने प्रचारात सहभाग घेतला असून, मतदारांसमोर प्रा. फरांदे यांच्या दहा वर्षांच्या विकास कार्याचा आढावा घेतला जात आहे.
दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, यंदा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.