नाशिक जिल्ह्यातील तिरढे तालुका पेठ येथे नमस्ते नाशिक फाउंडेशनने कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजुरांसोबत एक अनोखी दिवाळी साजरी केली. “जिथे कमी तिथे आम्ही” या संकल्पनेवर चालणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या नेतृत्वात 100 हून अधिक गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या साड्या मिळाल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद ही दिवाळीची खरी ओळख बनली.
दिवाळी साजरी करण्यासाठी केवळ आपल्या घरात दिवे लावण्याऐवजी प्रत्येकाच्या मनात ज्ञान आणि प्रेरणेचा दीप उजळावा, असे संस्थेचे ध्येय आहे. या उपक्रमात गरजू मुलींना ड्रेस, शेतमजुरांना शर्ट आणि पॅन्ट, लहान मुलांना मिठाई आणि वह्या यांचेही वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक घरात दीप प्रज्वलित राहावा याकरिता विशेष पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप केले गेले.

कार्यक्रमात नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अश्विनी पाटील, मीनाक्षी नागपुरे, दीपा भावसार, खजिनदार संदीप देव यांची उपस्थिती होती. तसेच तिरढे गावाचे माजी सरपंच सोमनाथ नाठे, चंद्रकांत नाठे, नामदेव नाठे, आणि अन्य मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक व गावकरी या उपक्रमाला साक्षीदार होते. दीपक अग्रवाल, अनिल नाहर, ॲड. प्रकाश सुराणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या आगळ्या वेगळ्या दिवाळीने कष्टकरी महिलांना आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना एक दिवसाचा आनंद दिला आणि या दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

