मनमाड शहरापासून काही अंतरावर पानेवाडी जवळ आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली, ज्यात इंधन वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने (MH-15, CC-5523) समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या एका बालकासह त्याच्या आईला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच-19, ईएच-5568 या क्रमांकाच्या दुचाकीवर सचिन भिकन मोहिते (वय 30), वर्षा सचिन मोहिते (वय 25), जय भाईदास बोराळे (वय 4) आणि ओम भाईदास बोराळे (वय 6) हे दिवाळी साजरी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पारोळाकडे जात होते. मात्र, अचानक घडलेल्या या अपघातात चौघे जण जागीच ठार झाले.
जखमी झालेल्या मनिषा भाईदास बोराळे (वय 30) आणि त्यांचा मुलगा जगदीश बोराळे (वय 2) यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, तसेच पोलीसही लवकरच घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबाचे दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न काळाने हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.