निफाड: निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढत असून, आज शनिवार (दि. ३०) रोजी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशांवर घसरल्याची नोंद झाली आहे. चालू हंगामातील हे नीचांकी तापमान असून द्राक्ष बागाईतदारांसाठी ही थंडी चिंतेचा विषय बनली आहे. घसरलेल्या तापमानामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबण्याची शक्यता आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागाईतदारांसमोर मालाचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत:
- ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा: पहाटेच्या वेळी द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
- शेकोटी आणि धुराचा वापर: बागांत शेकोटी पेटवून धुराद्वारे उष्णता निर्माण करावी, ज्यामुळे द्राक्षमाल थंडीपासून सुरक्षित राहील. गहु, हरभरा यांसारख्या पिकांसाठी ही थंडी पोषक मानली जात असून, त्यांना चांगल्या उत्पादनासाठी थंडी उपयुक्त ठरत आहे.
थंडीच्या प्रभावामुळे द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत बागाईतदारांनी वेळेत उपाययोजना केल्यास नुकसान कमी होईल. सरकारनेही द्राक्ष उत्पादकांसाठी मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून होत आहे.