google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक – प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. विभागातील ९० केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.

मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत आहे. शिक्षणसम्राट, साखर सम्राटांसारखे दिग्गज रिंगणात असल्याने शिक्षक मतदारांच्या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेतेही आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते. महायुतीतील बिघाडी, ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणारे दोन अपक्ष, बनावट मतदारांची नोंदणी, प्रलोभने दाखविण्याचे प्रकार अशा अनेक मुद्यांवरून ही निवडणूक चर्चेत आहे.

जिल्हानिहाय मतदार

शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदारांमध्ये २२ हजार ८६५ महिला तर, ४६ हजार ५०२ पुरुष शिक्षक मतदार आहेत. सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत. यात १० हजार ५८९ महिला तर १४ हजार ७१३ पुरुष मतदार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार असून जळगावमध्ये १३ हजार १२२, धुळे जिल्ह्यात आठ हजार १५९ आणि नंदुरबारमध्ये पाच हजार ३९३ मतदार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *