google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने खबरदारी घ्यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

author
0 minutes, 0 seconds Read

मुंबई, दि. २४ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे. सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने विधिमंडळ सदस्य आणि पत्रकारांना उपलब्ध व्हावा. साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधानभवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस पोलीस, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, हवामान विभाग, एमटीएनएल, मध्य आणि कोकण रेल्वे, मेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै, २०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे.  त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने नियोजन करावे. शनिवार, २९ जून, २०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावे, सुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीस, अन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी, महिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्ष, स्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी स्वच्छता होईल, अशी दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

या बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, उपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकर, विधानमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, विशेष शाखेचे दत्तात्रय कांबळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, मुंबई महापालिकेचे महेश नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, विद्याधर पाटसकर, श्रीमती रेशमा चव्हाण आणि विजय सानप, अग्न‍िशमन समादेशक अधिकारी बाळासाहेब पाटील, मध्य रेल्वेचे सहायक परिचालन प्रबंधक अरुणकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *