नाशिक – मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते, मात्र पावसाने अद्याप माघार घेतलेली नाही. उलटपक्षी, उद्यापासून (२३ सप्टेंबर) राज्यातील बहुतेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. अंदमानमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दिशेने सरकत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात विविध भागांत पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे
हवामान विभागाच्या पुणे केंद्रातील तज्ज्ञ डॉ. डी. के. होसाळीकर यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) समाजमाध्यमावर राज्यात जोरदार पावसाची भविष्यवाणी केली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या चार-पाच दिवसांत मराठवाडा, घाट भाग आणि कोकणातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे
शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पीक कापणीच्या आधी हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे, कारण मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
२३ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर मुंबई, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.