२० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होतील. या योजनेच्या प्रगतीचे अधोरेखन करताना, मोदी यांच्याहस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरण केले जाईल. योजनेअंतर्गत १८ विविध व्यापारातील कारागिरांना पतपुरवठा प्रदान करून त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. या यशस्वी योजनाच्या सन्मानार्थ पंतप्रधानांच्या हस्ते एक स्मृती टपाल तिकीट अनावरण केले जाईल.
कार्यक्रमादरम्यान, मोदी अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी करतील. हे पार्क १००० एकरात उभारले जाणार असून, वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. भारताला जागतिक वस्त्रोद्योग केंद्र बनवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
याचबरोबर, महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा उद्देश असलेल्या या योजनेतून दरवर्षी १.५ लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पंतप्रधानांच्या हस्ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” देखील सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. विशेषत: मागासवर्गीय महिलांसाठी २५% आरक्षणासह, स्टार्टअप्ससाठी २५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.
या भेटीद्वारे, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील विकासात नवा अध्याय लिहिणार असून, विविध योजनांच्या शुभारंभासह, राज्याच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीला गती देणार आहेत.