कल्याण :- शेलार कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात अनोख्या संकल्पनेतून ‘अज्ञान’ या विषयावर आधारित आरास साकारली आहे. प्रत्येक वर्षी एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने गणपतीची आरास करणाऱ्या शेलार कुटुंबीयांनी यंदा लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, वैज्ञानिक अज्ञान आणि शास्त्रीय अज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्याचा उद्देश ठेवला आहे.
आरासमधून त्यांनी समाजातील विविध प्रकारच्या अज्ञानावर प्रकाश टाकला आहे. प्रमुख मुद्द्यांमध्ये लैंगिक शिक्षणाचा अभाव, मासिक पाळीविषयीचे गैरसमज, शुभ-अशुभ गोष्टींविषयी अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक कारणांबद्दल अज्ञान समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, आजही आपल्या समाजात लहान मुलांना ‘चांगला आणि वाईट स्पर्श’ याबद्दल योग्य माहिती मिळत नाही. अश्लील सामग्री आणि सोशल मीडियाच्या चुकीच्या प्रभावामुळे लैंगिक शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यावर मात करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत संवाद साधण्याचे महत्त्वही त्यांनी आरासद्वारे मांडले आहे.
वैज्ञानिक अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न शास्त्रीय अज्ञानाविषयी बोलताना शेलार कुटुंबीयांनी आपल्या सणांमागील वैज्ञानिक महत्त्व समजावून दिले आहे. ते म्हणतात, “आपले हिंदू सण हे निसर्गचक्राशी निगडीत आहेत. उदा. संक्रांतीच्या काळात उष्ण पदार्थांचे सेवन, आषाढ-श्रावणात उपवास, दिवाळीत अभ्यंगस्नान अशा पद्धतींचा शास्त्रीय आधार आहे.”
मासिक पाळीविषयी गैरसमज काढून टाकण्याचा प्रयत्न त्याचबरोबर, मासिक पाळीविषयी समाजात पसरलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा देखील या आरासमधून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेलार कुटुंबीयांनी या विषयावर खुल्या संवादाची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “मासिक पाळी हा स्त्रीच्या मातृत्वाचा आरंभ आहे, ज्याचा सन्मान केला गेला पाहिजे. मात्र, आजही समाजात मासिक पाळीला विटाळ म्हणून संबोधले जाते. याचा फेरविचार होणे गरजेचे आहे.”
पर्यावरणपूरक आरास यंदाचा गणेशोत्सव शेलार कुटुंबीयांनी संपूर्णत: पर्यावरणपूरक बनवला आहे. मूर्ती शाडू मातीची असून, आराससाठी पर्यावरणास अनुकूल वस्तूंचाच वापर करण्यात आला आहे. “अज्ञानामुळे समाजातील विकृती वाढत आहेत. त्याला सामूहिक जनजागृती आणि योग्य शिक्षणानेच प्रतिबंध करता येईल,” असे शेलार कुटुंबीयांचे मत आहे.