मुंबई

गोवंडी परिसरातील २१५ अनधिकृत झोपड्या निष्कासित

गोवंडी परिसरातील एका खासगी मोकळ्या जागेवर अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या सुमारे २१५ झोपड्यांवर मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी कारवाई केली. महानगरपालिकेच्या एम/पूर्व विभाग हद्दीतील गोवंडी परिसरात प्रभाग क्रमांक १४४ मधील सीटीएस क्रमांक ५/६, देवनार गांव, पाटीलवाडी येथे खासगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन सुमारे २१५ अनधिकृत झोपडीधारकांना नोटीस बजावली होती. या नोटीसधारकांनी अनधिकृत झोपड्यांना निष्कासित होण्यापासून संरक्षण मिळावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे व प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाहीत आणि नोटीसधारकांची याचिका देखील फेटाळून लावली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर, महानगरपालिकेतर्फे ३० एप्रिल २०२२ रोजी नोटीसधारकांना अंतिम आदेश पारित करण्यात आले. त्यानंतर या सर्व २१५ झोपड्यांचे मंगळवारी निष्कासन करण्यात आले. एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वाखाली २ जेसीबी संयंत्र व २० कामगार यांच्या मदतीने ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याप्रसंगी गोवंडी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close