राजकिय

येत्या १४ तारखेला अनेकांचे मास्क काढणार; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

राज्यात सध्या विचारांचं प्रदूषण होत आहे. विकृत विचार मांडले जात आहेत. बऱ्याच दिवसांनी मास्क काढून भाषण करतोय, मात्र १४ तारखेला अनेकांचा मास्क काढणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वांसाठी पाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी गोरेगाव येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. थापा मारणारे खूप आहेत, पण कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत. लवकरच येत्या काळात एकच तिकीट सर्वत्र वापरता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,  वस्त्रोद्योग- मत्स्यव्यवसाय मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महानगरपालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनिल प्रभू, आमदार सुनिल शिंदे, आमदार रविंद्र वायकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विलास पोतनीस, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर एडव्होकेट सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू, परिमंडळीय उपायुक्त विजय बालमवार, ‘पी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, जलअभियंता संजय आर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यापुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जे नाहीत, त्याच्याच बातम्या होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र मी वेगळे काही राजकीय बोलून पाणी गढूळ करणार नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीकेची संधी सोडली नाही. सर्वांसाठी पाणी धोरण असणारी मुंबई महापालिका पहिली आहे, याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. नळातले पाणी दाखवायचे नाही आणि तुंबलेले पाणी दाखवायचे, असा प्रकार सुरु असल्याचे सांगत, हिंदमाताला पाणी साचू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचेही म्हणाले.
माझा जन्म मुंबईचा असल्याने मी पक्का मुंबईकर आहेच आणि एका गोष्टीचा नक्की अभिमान आहे की, मुंबईत जन्मलेला हा राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. मी हाच विचार करत होतो, की कालच्या १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्राला ६२ वर्षे झाली आणि ६२ वर्षांपूर्वी माझे अजोबा त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांमधील एक नेते होते. पहिल्या पाचमधील एक होते. मागील काही काळातील बदलती मुंबई बघतच आम्ही मोठं झालो आहोत. तेव्हाची मुंबई कशी होती, आताची कशी आहे आणि उद्याची कशी असणार? हा एक मोठा प्रश्नच आहे. ही योजना राबवणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. तसंच येत्या काही काळात जास्तीत जास्त इलेक्ट्रीक बस शहरात चालवणारी मुंबई महापालिका ही पहिला महापालिका असणार आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्याचं काम देखील महापालिका करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close