राजकिय

महाड पूर निवारणीसह वीर ते रानवडी दरम्यान रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्न लवकर सोडविणार; खा.दानवे

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन

कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील वीर ते रत्नागिरी जिल्ह्यातील रानवडी दरम्यानच्या रेल्वे दुपदरीकरणांसदर्भात त्याचप्रमाणे महाड मधील रेल्वेच्या हद्दीतील दासगाव येथे पूर निवारण यंत्रणा उभारण्यासंदर्भात संबंधित अधिका-यांची बैठक घेऊन या दोन्ही समस्या दूर करण्याच्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येतील व लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिले.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रश्न तसेच महाड येथील पूर निवारणाच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चा करताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, महाडच्या आधी दासगाव येथे ६० मी.चा रेल्वेचा भराव टाकला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर ते पावसाचे पाणी सुमारे ७२ तास तिथेच टिकून राहते. जेव्हा ओहोटी येते तेव्हाही पाणी ओसरण्यासाठी मार्ग नाही. ते पाणी ओसरले गेल्यास पूराची तीव्रता कमी होऊ शकते व पूर निवारणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. आपले म्हणणे मांडताना दरेकर यांनी तेथील जागेचा आराखडा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दाखविला. दानवे यांनी हा विषय समजून घेतला व याविषयी संबंधित अधिक-यांना सूचना देऊन बैठक घेण्यास सांगितले.
तसेच कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीमधील रानवडी ते सांवतवाडी दरम्यान दोन रेल्वे लाईन आहेत. तर रायगडमधील वीर व रत्नागिरीमधील रानवडी  दरम्यान रेल्वेची एक लाईन आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणा-या रेल्वे गाड्या रानवडी येथे थांबतात तर सांवतवाडी- गोव्याहून येणा-या गाड्याही रानवडी येथे एकाच मार्गावर थांबतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे येथे दोन रेल्वे लाईन टाकून दुपदरीकरण झाल्यास येथील मार्ग सुरळित होईल. असे दरेकर यांनी सांगितले. याविषयाच्या अनुषंगाने रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी रेल्वेच्या अधिका-यांना सदर जागेची पाहणी करुन त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या व हा प्रश्न लवकर सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दरेकर यांना दिले. याप्रसंगी महाड पूर निवारण समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री  दानवे यांना निवेदन सादर केले. यावेळी महाड पूर निवारण समितीचे नितीन पावले, डॉ. समीर बुटाला, इंजिनियर संजीव मेहता, रवींद्र वेरनेकर, रायगड भाजपचे बिपीन म्हामुणकर, कुद्रमती मॅडम, संदीप ठोंबरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close